मुस्लिम कुटुंबाचा लग्न पत्रिकेतून सामाजिक सलोखा

मैत्रिखातर जोपासला सर्वधर्मिय बंधूभाव
हिवरा आश्रम येथील कडू शाह मकबुल शाह यांच्या कन्येच्या पत्रिकेची सोशल मीडियावर चर्चा

संदीप अंभोरे । मुंबई
मुस्लिम समाजाच्या पत्रिकेवर भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा असलेली एक पत्रिका सध्या समाजमाध्यमावर जोरदार व्हायरल झालेली दिसत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील कडू शाह मकबुल शाह यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त त्यांनी छापलेली पत्रिका सध्या व्हायरल झालेली आहे. मात्र यामागचे सत्य वेगळेच असून त्यांनी मुस्लिम, हिंदू आणि बौद्ध अशा तीन समाजासाठी वेगवेगळ्या पत्रिका छापल्या आहेत.
कडू शाह मकबुल शाह यांची कन्या परवीन हिचा विवाह सत्तार शाह आमद शाह यांचे चिरंजीव महेबुब शाह यांच्यासोबत 18 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी त्यांनी अशी अनोखी पत्रिका छापली आहे.
हिवरा आश्रम येथील कडू शाह मकबुल शाह यांचा मच्छीचा व्यापार आहे. ते चिखली मेहकर, बुलडाणा अशा ठिकाणच्या व्यापार्‍यांना मच्छीचा पुरवठा करतात. व्यापाराच्या निमित्ताने मराठा आणि बौद्ध समाजाचे मित्र मंडळी असल्यामुळे तीन पत्रिका छापल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वांसाठी वरण, भात, भाजी, पोळी असं साधं जेवण आहे, असे त्यांनी सांगितले.
शाह यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. दोन मुलींची लग्नं झालेली असून आता शेवटच्या मुलीचे लग्न आहे. घरात मुलीचं शेवटचं लग्न असल्याने सगळ्यांना आनंदात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे तीन्ही समाजाच्या वेगवेगळ्या पत्रिका छापून सगळ्यांच आनंद देऊ, असा माझा हेतू होता, असे कडू शाह यांनी सांगितले.

या देशात जन्माला आलो याचा मला खूप अभिमान आहे. परंतु ही गोष्ट आपण लोकांच्या घरोघरी जाऊन सांगू शकत नाही, त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. समाजात सलोखा राहावा आणि प्रेम वाढावे हाच यामागचा हेतू होता. मात्र त्याची राज्यभरात दखल घेतली जाईल, असं वाटलं नव्हतं, असेही शाह म्हणाले.
अशी अनोखी पत्रिका छापल्यामुळे राज्यभरातून फोन येत आहेत. लोक वधु-वरांना शुभेच्छा देत आहेत. माझेही अभिनंदन करत आहेत. यामुळे होणारे जावई, मुलगी, व्याही, सर्व पाहूणे मंडळी आणि मित्र मंडळींना खूप आनंद होत आहे. पण आज माझे शिक्षक बन्सोडे गुरूजी हवे होते. त्यांना आज खूप आनंद झाला असता की, आपला हा विद्यार्थी शाळा शिकला नाही पण माणूस म्हणून तो आज मोठा झाला. याचा त्यांना नक्कीच आनंद झाला असता, अशी आपल्या आवडत्या शिक्षकाची आठवण कडू शाह यांनी ताजी केली.

उपरवालेका काम है!
उर्दू पत्रिका वाचता येणार नाहीत. हा विचार सर्वात आधी डोक्यात आला. त्यानंतर मग विचार करत असतानाच अशा पत्रिका छापण्याचे ठरवले. तसं बघितलं तर मी अडाणी आहे. पंधरा दिवस शाळेत गेलो, अन् सोळाव्या दिवशी घरी आलो. बस्स झालं आपलं शिक्षण! मग शिक्षण नसताना हे काम होणं म्हणजे उपरवाल्याचंच काम आहे, असेही कडू शाह म्हणाले.

वाद झाला नाही!

पत्रिकेवर गणपती, भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा छापण्यामुळे समाजातून विरोध झाला नाही. मुस्लिम समाजासाठी वेगळ्या उर्दू भाषेत पत्रिका छापल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी माझ्या भावना समजून घेतल्या आणि सर्व समाजबांधवांनी सहकार्य केले, असेही ते म्हणाले.

अशा आगळी वेगळी पत्रिका त्यांनी छापल्याचे जेव्हा आम्हाला समजले, तेव्हा आम्हीदेखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तशाच पत्रिका छापल्या. त्यांनी समाजातील सलोखा राखण्यासाठी खूप मोठे पाऊल उचलले आहे. सर्व समाजातील लोकांकडून त्यांचे कौतुक होते, तेव्हा आमची छाती अभिमाने भरून येते,
-सत्तार शाह आमद शाह, व्याही

© पत्रकार संदीप अंभोरे

Advertisements

माझ्या भिमाने देश उचलला एका पेनाच्या टोकावर

अकोला जिल्ह्यातील अंध कुटुंबाची बाबासाहेबांना अनोखी स्वरांजली

संदीप अंभोरे। मुंबई
‘आले कीती गेले सारे चकनाचूर झाले, कोण म्हणतो देश आमचा आहे नोटावर, खरं खोटं काय तुम्ही ठेवा ओठावर, अन् माझ्या भिमानं देश उचलला, एका पेनाच्या टोकावर’ या सारख्या गीतांनी अकोला जिल्हयातील एका अंध कुटुंबाने गुरुवारी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अनोखी स्वरांजली वाहिली.
‘होता लाखामध्ये एक सुभेदाचा तो लेकं, त्याच्या नावाचा होता दरारा, त्याच्या पेनाले माय वं थरर्र कापे भारत सारा’, ‘नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाय नोटाला, माझ्या भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला’, ‘ओ बात करो पैदा तुम अपनी जुबानो, दुनिया भी कहे कुछ है, इन भिन दिवानो मे’, अशा गीतांनी गुरुवारी चैत्यभूमीवर अकोट तालुक्यातील धामणगाव चोरे येथील आकाश इंगोले, नंदकुमार इंगोले, साहेबराव पातोडे, आम्रपाली पातोडे या चार अंध कुटुंबियांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अनोखे अभिवादन केले.
आकाश इंगोले, आपला भाऊ नंदकुमार, बहिण आम्रपाली आणि जावई साहेबराव पातोड यांच्यासह दरवर्षी चैत्यभूमीवर आपली कला सादर करण्यासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. कला सादर करुन मिळालेल्या पैशातूनच आमचे घर चालते, असेही त्यांनी सांगिते. अंध असल्यामुळे कामधंदा होत नाही त्यामुळे गीत-संगीताच्या माध्यमातूनच आमचा संसार चालतो. ज्या ठिकाणी असे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आम्ही आमची कला सादर करण्यासाठी जातो आणि कार्यक्रम नसेल तेव्हा अकोला ते बडनेरा दरम्यान रेल्वेत खेळणे विकण्याचे काम करतो, असेही आकाश इंगोले यांनी सांगितले.

गावागावात भीम गितांचे कार्यक्रम करुन आम्ही आमचा प्रपंच चालवतो. शंभर टक्के आंधळे असूनही आमच्यापैकी फक्त नंदुभाऊलाच 600 रुपये सरकारी पेंशन मिळते. मी दोनवेळा पेन्शनसाठी अर्ज केला होता, परंतू तो अर्ज तहसीलदारांनी फेटाळून लावला. अडीच एकर शेती असल्याचे कारण पुढे करत त्यांनी पेन्शचा अर्ज फेटाळला होता.
-आकाश इंगोले

© पत्रकार संदीप अंभोरे

नेत्यांची तोंडे पाहायला येत नाही!

चैत्यभूमीवरील गटातटांच्या दुकानदारीवर संताप

दादरमधील सोवळेबाजांनाही सणसणीत चपराक

संदीप अंभोरे । मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दरसाल बेकीची दुकाने मांडून जोरदार होर्डिंग्ज, बॅनरबाजी करणार्‍या नेत्यांना चैत्यभूमीवर आलेल्या राज्य व देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखोंच्या संख्येने येणार्‍या भीमानुयायांनी जोरदार चपराक लगावली आहे. आम्ही एवढ्या दुरून बाबासाहेबांना अभिवादन करायला येतो पण नाइलाजाने होर्डिंग्जवरच्या नेत्यांची तोंडं पाहावी लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया असंख्य भिमानुयायांनी महाराष्ट्र दिनमानशी बोलताना व्यक्त केली.
चैत्यभूमीकडे दरवर्षी 6 डिसेंबरला दाखल होणारे भीमानुयायांचे जत्थे पाहून दोन ते तीन दिवस आधीपासून दादर, शिवाजी पार्कमधील सोवळेबाज आपल्या घराचे कडी-कोयंडे लावून पसार होतात. देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेले गरीब भीमानुयायी हा परिसर अस्वच्छ करतात, असा सूर ते लावत असतात. परंतु गेल्या काही वर्षांची परंपरा राखत यंदाही आंबेडकरी तरुणांनी या सोवळेबाजांना सणसणीत चपराक लावली आहे. सोशल मिडियावरील आवाहनाला प्रतिसाद देत भीम फाउंडेशन व अन्य काही संघटनांच्या तरुणांनी चैत्यभूमी परिसरात 4, 5, 6 आणि 7 डिसेंबर अशी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. हे तरुण शिवाजी पार्क व चैत्यभूमी परिसरात मोठ्या हिरारीने सहभाग घेऊ न कचरा गोळा करताना दिसत होते. ‘आपली भूमी चैत्यभूमी, आपली भूमी’ स्वच्छ भूमी हेच आवाहन ते करत होते.
होर्डिंग्जबाजीतून भीमसैनिकांनी भुलवण्याचा प्रयत्न जनाधार संपलेल्या नेत्यांकडून दरवर्षी अभिवादन सभांतून सुरू असतो. यंदाही महापालिकेने नागरिकांसाठी केलेल्या निवारा मंडपासमोर आपल्या सभेचे व्यासपीठ उभारून लोकांना वेठीस धरण्याचे काम या गटबाजांनी केले होते. किमान यांची भाषणे सुरू झाली की, लोक उठून जातात. किंवा जाता तरी येते, पण लागलेल्या होर्डिंगवरील नेत्यांची तोंडं इच्छा नसून बघावी लागत असल्याने खूप चीड येते, असे बीड जिल्ह्यातील एक तरुण पोटतिडकीने बोलत होता.
शिवाजी पार्कातील नेत्यांच्या गटातटांचे सभांसाठी उभारलेले तंबू पाहून भीमानुयायी त्यांच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत होते. यांच्या सभेची व्यसपीठे बघून जत्रेतील तमाशाच्या फडांची आठवण होते. या राजकीय नेत्यांना आपल्या स्वार्थी राजकारणापाई महापरिनिर्वाण दिनाचाही विसर पडला आहे. यांच्या व्यासपीठावरून गर्दी जमवण्यासाठी गाणे बजावणे केले जाते. आजच्या दिवशी आम्हाला हे अपेक्षित नाही. या दिवसाचे पावित्र्य राखले गेले पाहिजेत. मात्र या नेत्यांना फक्त आपली दुकाने चालवण्यात रस आहे, असे येथे भेटलेले काही तरुण बोलत होते.

अभिवादन सभा कशासाठी?
लोक देशाच्या कोपर्‍यातून बाबासाहेबांना अभिवादन करायला येतात. याचे राजकीय भांडवल करून हे तथाकथित पुढारी, समाजाचे ठेकेदार अभिवादन सभेच्या नावाखाली आपली दुकानदारी करण्यात धन्यता मानतात. येणार्‍या अनुयायांचा आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी वापर करतात. पुढच्या वर्षी या तथाकथित राजकीय अभिवादन सभांबाबत जनजागृती करून लोकांना या सभांची उपयोगिता लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करू, असे असंख्य तरुणांनी सांगितले.

© पत्रकार संदीप अंभोरे

अ‍ॅक्वा..

राज्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळे आजच्या घडीला पाण्याचा प्रचंड तुटवडा जानवत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याची स्थिती तर अत्यंत चिंताजनक आहे. ग्रामीण भागात आजच नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. खरं आव्हान तर पुढील काळात असणार आहे. कडक उन्हाच्या झळा आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य याचा माणसांसोबतच मुक्या जनावरांनाही सामना करावा लागणार आहे. शेतकर्‍यांना गुरंढोरं कशी जगवावी याची चिंता आजच सतावत आहे. जंगलातील प्राणी, पशु, पक्षी यांचा तर विचारच न केलेला बरा. ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या या भीषण समस्येचा हा घेतलेला धांडोळा..

मादेव मावसा, चाला आना बरं हो पयशे! बंम नोटा हायेत वाटते राजा तुमच्याजोळ! पेवात तं तिजोरी दाबून ठेवेल नाई ना हो बावाजी! इतला टाईम लाऊन रायले! इतल्या टायमात तं अमेरीकीतून पयशे आले असते राजा! असं असते का कुठी! मलेबी कामं हायेत ना! दोन तीन गावात पानी घीऊन जा लागते आजून! नसतीन पयशे तं तसं सांगा!
तसं नाई ना बे शाम्या! तू तं कईबी निरा घोळ्यावरच येतं बे! आमासक तं थाबत जाय बावा! तुयी मावशी तं अशी बोहारी हाय गळ्या की, कईच काई सापळत नाई तिच्या हातचं! तिले तरी सकाऊनच वावरात जायाच्या आंधी मन्लं की, तो शाम्या येईन अ‍ॅक्वावाला! त्याले पान्याचे पयशे द्या लागतीन आज! हप्ताभर्‍याचे हायेत मन्लं त्याचे पयशे! अबे ठुयतो मने ना मले, अन आता दिसून नाई रायले! सांग आता काय कराव मानसानं!
मीच का तुमच्या मांगे लागलो व्हतो राजा. आपला रोजचाच धंदा हाय. तुमी का सकायच गाव सोळून थोळीच जाऊन रायले काई!
कोनाचे पयशे आंगावर असले की, मलेच तं गमत नाई बे लेका! नसतीन तवा काई वाटत नाई पन जोळ असूनशानी जर तू वापीस चाल्ला माया घरुन, तं मंग माया मनाले लान खराब वाटून रायलं अशीन, तूच सांग बरं! समजा तुनं सकायपासून पानी बंद करुन टाकलं आमचं तं मंग कोन्या भावात पळीन ते आमाले! कोनी घोटभर पान्याले उभं नाई करत बाबू! तुया अ‍ॅक्वावरच तं सरं गाव जित्तं हाय असच मना लागीन आता!
तसं काई नाई हो राजा मावसा, त्या भगवंत परमात्म्याच्या पुळे कोन जाते हो! त्याच्याच मनात अशीन आपल्या हातून शेवा घळोयाची, मनून आपूनबी थळीतल्या चार पाच गावायची तान भागोऊन रायलो! सरा हिसोब तो देवच लिवते हो! त्याच्याजोळच असते सर्‍यायची लिखापळी! आपून सर्वे लोकं त्याच्या हुकमाचे ताबेदार हावो. तो इधाताच घेते आपल्याजोळून कामं करुन! जाऊ द्या ते, चाला जातो. तुमच्या जोळच्या गोठी काई सरत नाईत बावा, मले भक्कम कामं हायेत. पान्याचे पयशे जमा करुन शेगावले जा लागते बँकेत, आपल्या छोटा हत्तीचा हप्ता भरा लगत ना या मयन्याचा! नाई भरसान कदी तं दुसर्‍यादिशीच ते घरी येतात सायाचे बँकेवाले! कुठी बसता त्यायच्या नांदी लागत. मनून पयशे जमा कर्‍याची घाई हाय मले, नाईतं काहाले इतला मांगं लागलो असतो मी तुमच्या हो राजा!
मादेवबॉ, काय मन्ते हो गळी शाम्या! लय वाखोळचा बळबळ करुन रायला लेकाचा, मनून मन्लं काय हाय तं पाऊन येवाव! काय चालू व्हतं बावा इतलं तुमचं दोघायचं!
काय अशीन हो राजा, तुयशीरामभाऊ! तो आला की समजून घ्याचं की पयशायचंच काईतरी अशीन मनूनशानी! अ‍ॅक्वावाला हाय ना तो गळी, सोपी हाय का? इस रुपये बॅरलनं इकते ना गळी त्याच्या इरीचं पानी! चार-साहा मयन्यातच तं एकाचे दोन छोटे हत्ती केले पठ्ठ्यानंं पान्याच्या पयशावर! निरा पयशायच्या गड्ड्यायवरच झोपत अशीन तं काय सांगाव गळी रातच्यानं!
काय सांगाव बॉ, झोतपयबी अशीन! आता पान्याचाच पयसा हाय! पन काहो राजा, प्याचं पानी कदी इकत घ्या लागीन असा इचार केल्ता तुमी?
नाई हो तुयशीराम भाऊ! बाराय मयने आपल्या मन नदीले पानी रायत जाय! दोनीबी कराडा डचाडच भरुन रायत जात नदीच्या! कवाच असं नाई झालं की, पान्याची टंचाई आली अशीन अवघ्या थळीतल्या गावायले! काई लय नाई, पंधरा इस वर्साआंधीची गोठ अशीन! तवा तं नळ कहाले मन्तात तेबी माईत नोतं! दोन चार हापशा व्हत्या गावात, नाई असं नाई, पन नदीचंच पानी भरपूर असल्यावर कोन जाते हो बॉ त्या हापशीवर कंबंळलं दुखव्याले! रोज सकाऊन, सद्याकाई बंदं गाव नदीच्या रस्त्यानं दिसत जाये! प्याचं, वापर्‍याचं सर्वच पानी नदीचचं असत जाये! पानी इतलं सुध्द व्हतं की, त्याले काईच कर्‍याचं काम नोतं. आता तं बापा कोनता अ‍ॅक्वा का फॅक्वा घ्या की, काईबी घ्या, डाक्टर मन्तातच पानी तपवून पेत जा! त्या काळात तं पानी ना तपव्याचं काम व्हतं ना गावून घ्याचं! बिनघोर प्या, काईच नोतं व्हतं! बिमार्‍या फिमार्‍या काईच नोतं ना हो तवा!
खरंच हाय हो राजा मादेवबॉ! आता तं जीव द्याले घोटभर पानी नाई रायलं नदीत! दहा पंधरा वर्षे झाले असतीन म्या तं नदीचे दोन काठ भरुन पानीबी पायल नाई! कोळल्ली ढन्न पडेल हाय नदी! भयान व्हयेल हाय सरी थळी! पयले तं दिवसदिवसभर नदीत रायलं तरी गमत जाये मन्लं! आता तं काईच गमत नाई राजा! पावव नाई वाटत नदीच्या इकळे इतली भंगली! त्यात आता रेतीवाल्यायनं तं हालतच केली नदीची. जेशीबीनं गड्डे पाळूपाळू रेती खंदतात अन इकतात. पुरी नदी टाकली खराब करुन राजा, या लोकायनंं. पयले नदीच्या काठावरची माती इकली इट भट्टीवाल्यायले अन आता रेती इकून रायले! त्याच्याचनं नदीचं पयलं रुपच हारपलं राजा!

नाईतं कायतं हो, मानूस हा जीवच तसा हाय भाऊ! त्याले फुकटचं पानीबी नाई पुरत राजा, बाकीच्या गोठी तं बोल्यालेच नाई पुरत! मनून तं आपल्यावर अशी पाळी येल हाये, तुमाले प्याचं पानीबी आता इकत घ्या लागून रायलं. इस रुपये बॅरलनं! आजून तं दिल्ली लय दूर हाय तुयशीरामभाऊ! उनाया लाग्याचा हाय आजून! आजच प्याच्या पान्याचा वांदा हाय, तोबी मानसाच्या बरं! जनवारायचा तं आजून आपूनबी इचारबी नाई करून रायलो. त्यायचं काय व्हयीन. ढोरंवासरं, जीव, जंतू, पशुपक्षी सगळ्यायलेच पानी लागते की नाई! त्यायचा इचार कवा कराव आपून. त्यायचा इचार कोन करीन आपल्याले तं बाकीच्यायचा इचार कर्‍याले टाईमच नाई. आपून आपल्यायातच गुतेल हावो. एका छोटा हत्तीचे दोन कशे व्हतीन अन एका एकराचे दोन एक्कर कशे व्हतीन हेच पायते मानूस!
तुमाले काय सांगू राजा मादेवबॉ! वावरात गेलं की निरा मोर, हरणा पानी नाई भेटत मनून मरतात हो! पुळे तं कडक उनाया बाकी हाय आजून, काय व्हईन तं हो बॉ मुक्या जनवारायचं! अरे त्याच जनवारायचं नाई बॉ, आपले घरचे ढोरंवासरंं बी जगव्याचं टेन्शन येल हाये मले तं मयनाकभर पुरीन पानी ढोरावासरायले! पुळचे दिवस कशे काळाव काय मालून सायाचे!
तुयशीरामभाऊ, आपून टेन्शन घीऊन काई व्हनार हाय थोळीच काई! जे तकदीरात अशीन ते व्हईन, त्याले कोन रोखू शकते. रोख्याचचं अशीन तं पावसायाचं वाऊन जानारं पानी रोखलं पायजे! पानी अडोलं पायजे, जमीनीत जीरोलं पायजे, आपून जर आता पानी अडोलं, जमिनीत मुरोलं तं पुळच्या आपल्या पिळ्या सुखानं रायतीन, नाईतं आपून जे भोगून रायलो त्याच्याऊन खतरनाक दिवस त्यायच्यावर येतीन, हे मी शंभर रुपयाच्या बाँडवर लिऊन देतो कधीना! नाईतं ध्यानात ठुयजा की, मादेवबॉनं काय मन्लं व्हतं!
© पत्रकार संदीप अंभोरे

उलंगवाळी

राज्यात सर्वदूर दुष्काळच्या झळा आता जाणवायला लागल्या असून त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पडत आहे. त्यात शेतकरी देशोधडीला लागलाच आहे. शेतमजुरांचे हाल तर त्याहूनही वाईट आहेत. दुष्काळामुळे शेतमजुरांपुढे दोन वेळच्या जेवणाची चिंता उभी ठाकली आहे, अशाच शेतमजुरांच्या व्यथा मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.

—————————————————————–

मालनबाई, चाला न वं माय, तुमी बयना लयच उशीर करता बरं वं घरीच! निरा सर्‍या बाया गेल्या बॉ पुळे! तुमच्या नांदी लागलो की नाई किलो दोन किलो कापूस कमीच भरते बयना! सकायपासून तुमच्यासाटी थांब्यालेच नाई पुरनार! आपल्याले वाटते बॉ घरापुळे घर हाय तं जावाव हायामियानं, पन तुमचं तं माय लयच चालते निरा अरामशीर, हे तं काईबी झालं गळ्या! पुळे निंगुन गेलं तं तिकुनय मनसान मंग!
तुले काय हाय बयना वं गीताबाई, नवरा-बायकोचं केलं आपलं की निंगाले! आमाले बयना चार लेकरं बुडा-बुडी अन आमी दोगं इतल्या लोकायचं करा लागते बॉ! तरी पायटपासून हात नाई रिकामा रायत मावाला! लोकायले वाटत अशीन का बॉ हे इना कारनच उशीर करत अशीन! दोरोजच हे बाई निंगत नाई वक्तावर! पन ज्याचं त्यालेच मालूम असते बयना वं!
अय, चाला वं मालन, गीताबाईऽऽ काय गोठी चालू हायेत माय एवळ्या लागे! सरं गाव गेलं पुळे अन तुमी भल्या माय गोठी करत बसता घरीच!
गोठी कहाच्या वं कस्तुराभाभी, पोरासोरायचं कर्‍याले वखत कसा निंगून जाते कयतच नाई बयना! गीताबाई तवाची मले मनुन रायली, सर्व्या बाया गेल्या मंते पुळे, आपून हाव घरी!
असं हाय का? म्यानलं कापूस येचतांनीबी करता येतात गोठी, असं घरी बसून कहाले बोला लागत! चाला उचला भरणं डोक्शावर अन निंगा कनंकनं माया मांगं! पयलेच तं कापूस नाई भरत, दिवसभराचा दहा किलो कापूस येचनं मुस्कील हाय, त्यात घरुनच उशीरानं गेलं तं तेवळाय भरनार नाई! मंग काय बजाराचेबी वांदे करुन घेवाव मंगयवारचे?
हव ना वं बराबर हाय ना कस्तुराभाभीचय बी, दरसाल आपून भीमरा पाटलाच्या वावरात कितकाला कापूस येचला बॉ! निरा साट-साट, सत्तर-सत्तर किलो!
तु मनुन रायली ते तं खरंच हाय वं मालन, यंंदाच सालमानच तसं हाय बयना, शीतादई कर्‍याच्या वक्ताले उलंगवाळ्या हून रायल्या ना अवंदा! म्या तं कईच नाई पायलं माय असं वं! आता आपली वय पन्नासच्या पुळे गेली अशीन ना! कई तरी असं झालं काय माय!
अवं अय गीताऽऽ पाय उचल नं व फटाफटऽऽ तुया तोंडाचा पट्टा चालू झाला की, चालूच व्हते मायऽऽ तुमच्या दोगीयवून बुड्डी हाव मन्याले, पन पाच कोस दनदन चालतो मन्लं आजूनबी! तुमी आजकालच्या पोरी बी अशा हा ना लेपशा! काईच धळं नाई तुमचं! अवं खटल्याचं करुनशानी वावरातलं करा लागे वं आमाले! तुमी काय करसान आमच्यासारकं बायाहो वं! अवं पावसायात अशी झळी लागे की नाई, ढोरं-वासरं मरे लोक! तितल्या झळीतबी गारापानी तुळवत वावरात जा लागे! कामधंदा तं काई चालेच ना, मंग दायदाना नसंत जाये घरात! अंबाळीची भाजी घरी आनून उलशाक पीठात शिजवून ते खाऊन दिवस काळेल हायेत मनलं आमी! तीन पोरी अन दोन पोरं कसा सवसार केला अशीन, सांगा ना तुमीच! आजकालच्या तुमी पोरी करसान का? अवं पवून जासान नवर्‍याच्या घरून! आता तं तशी झळी बी लागत नाई, अन पयल्यासारकं काई रायलं बी नाई! त्याच्याच्यानं तुमाले काय माईत रायनार हाय!
बाप्पा कस्तुराबाई लयच दिसानं दिसून रायली तु तंऽऽ, येनं पानमान खाय, ये! मालनबाई, गीताबाई या तुमी बी पान खायाले! नाई तं मंन्सान की बयीनीलेच बलावते, आमाले काय बलावलं त्यानं!
आमाले काई टाईम नाई रे बॉ इशीनात, त्वाल्याजोळची पानसुपारी खात रायलो तं आमी वावरात कई जावाव! आंदीच वखत हून गेला गेला!
अवं कस्तुराबाई जाशीन ना वं माय, पानसुपारीलेच कीती टाईम लागून रायला कायजून!

तसं नाई ना रे बाप्पा, तुले काय हाय झाळाखाली बसून ढोरावासरायवर ध्यान देवा लागत. आमचं तसं हाय का? आमाले उनातानात टोले घ्या लागत ना बाबू! सकायवकाय गेलं की आमासाक धंदा उरकते! आन दे बापा तु बी लयच हायेस! या वं इकडे बसा आमशाकऽऽ, खा पानमान! याची बी लयच मानुसकी दाटून येल हाय लगे आज! रस्त्यावरचे मानसं थांबवते बिचारा पान खायाले, मोठ्ठा गेला दानधरमवाला!
तसं नाई बाई, तु मायी भयीन लागतं बाप्पा, भावाच्या नात्यानं बलावलं बॉ तुले. नाईतन कहाले कोनी कोनाले थांबवते वं बाई! तसयबी दोन चार रोजानं मी जाऊन रायलो पुन्याले पोट भर्‍याले. मंग कोनाची भेट व्हते बापा अन नशीबात पुळे काय लिवेल हाय ते का कोनी वयखते! समजा जीवाचं काई झालंगिलं बरंवाईट तं करदोळाबी नाई जात बॉ वर घिऊन मानुस!
काऊन रे बाप्पा असा बोलतं! कामाधंद्याले जाऊन रायला मंजे का कायमचा थोडीच जाऊन रायला काई!
बाई, आपून सपनात बी बोम्बई, पुनं पायलं नाई! पन आता टाईम आनला देवानं! आता तिकडे वाचतो का मरतो, कोनाले ठाऊक हाय! आता आलीच येळ तं पोरं मन्तात की, जाऊ पुन्याले, तठी कामधंदा लागीन तं उपाशी रायाची पाळी येनार नाई आपल्यावर! त्यायचंबी बराबर हाय. आताच इकळे भनान उन तपून रायलं. लोकायनं सोयाबीन पेरलं, त्याले काईच नाई आलं. उळीद, मूंग गड्डीत गेले. आता पराट्यायची हालत तं तुमाले माईतच हाय. पराट्यायले वाळ नाई. काई काई वावरात तं जमीनबी नाई सोळली पराटीनं! एक-एक, दोन-दोन बोंड्या हायेत. त्याले काय येनार हाय. दोन चार लोकायच्या बगायतायच्या सोळल्या तं कोनाच्या वावरात कापूस झाला सांग बॉ मले. बरं बगायतायच्याबी पराट्यायले एक एक दोन येचे झाले की, काई रायत नाई. पानीच नाई तं त्यायचं तरी काय खरं हाय! मंग मले सांग शेतकर्‍यावरच जर आत्महत्या कर्‍याची पाळी आली अशीन तं मायासारका मजुर मानुस कसा जित्ता राईन, अशा दुस्काळात! मले तं हातपाय हालवाच लागतीन की नाई जीव वाचव्यासाटी! का माया पोरायले कोनी खाऊ घालनार हाय घरी बसून! पोरं म्हनत जात, तं म्या इचार केला जाऊ फोकनीचं जसं व्हईन तसं पाऊन घीऊ, मेलो तं मेलो अन रायलो तं रायलो!
अय दादा तसं कहाले म्हनतं बाप्पा! पुन्यात बी मानसंच रायतात, मर्‍याच्या बाता कहाले करतंऽऽ, दलिंदरी लागत असते नाऽऽ, अशानंऽऽ तसं बोलू नाई, शायन्या मानसानंऽऽ ..तिघींजणी एकादमात खेकसल्या.
गयावरची फाशी काळ्यासाटीच पुन्याले जाऊन रायलो ना वं बाई, थोडीच काई जीव देनारा हाव मी! पन एवळ्या मोठ्या शयरात आपून कईच गेलो नाई, आपल्या धरनी मायनं कईच आपल्यावर अशी येळ आनली नाई. कसयबी आजलोक आपलं पोट भरलंच. त्याच्याच्यानं गाव सोळून जातांनीबी कायज तुटते अन शयराचं नाव काळलं तरी पोटात गोया येते. मंग आता तुमीच सांगा बायाहो मी काय करु!
बराबर हाय इशीनात त्वालं बी. अवंदा काईच खरं नाई कोनाचंच. ना कास्तकाराचं ना पोटभरनार्‍या मजुराचं! इचारच हाय सर्व्या गोष्टीयचा यंदा! काय कराव इचारानं डोस्कं भनभन करते. मनून तं माया पोरायले पान्याचं असंतसं दिसताबराबर बोम्बईले पाठोलं. दोघायले मन्लं तुमचे पोरं सोरं घीऊनशानी जा, पोट भरा कसयबी! माई कायजी करु नोका! मी मालं पोट भरतो. कार्डावर कंटोर भेटते, गऊ, तांदूय भेटतात, भागवतो कसंयबी मालं मी! माया एकल्या जीवाचं काई नाई रे बाप्पा पन चार पाच मानसं घरात हायेत तुयासारक्याच्या त्यानं काय कराव, तो मोठाच इचार हाय गळ्या. देवानं बिचार्‍यानं मानसं, जीव-जंतू, ढोरं-वासरं सर्वायचीच उलंगवाळी केली रे बाप्पाऽऽ पन आता भगवंताले जर तेच मंजूर अशीन तं त्याले कोन काय करीन! बरं त्यात त्या बिचार्‍या परमेसवराचा तरी काय दोस, धरतीवर पापच एवळं वाढलं त्याच्याच्यानं देवाले तरी काय मनाव आपून! तु जाय बापा पुन्याले. अनंदानं रायजो! दोन चार मयने काय कामधंदा कर्‍याचा तो करजो अन पावसाया लागला की, सुखानं आपल्या गावले येजो! पुळच्या वर्शी सर्व्योयचं यवस्थित करते तो भगवंत! पायजो!
© पत्रकार संदीप अंभोरे,

दुस्काळ

वासुदेव मामा, आताच इऊन रायले काय खामगाववून? केवड्याले इकली मंग गाय? ..तंबाखू मळत रमेशनं विचारलं.
हव गळ्या, हे कायतं, पायत नाही गायीचे दोर हातातच हायेत आजून! लय पाय दुखून रायले पन सायाचे! खामगावलोक पायदल जाणं आता लय भारी जाते या वयात! पयले रवण्यादिवठाण्यालोक ढोरं घीऊन जायेल हाव बॉ, आता वय झालं पयल्यासारकं चालनं व्हत नाई गळ्या!
आता कहाले पायदल जातात हो लोकं! गाळ्या हायेत ना आता बंम व्हयेल! कीक मारली की बावा कुठीबी जा! पयलचा काळ गेला राजा आता! .. तोंडात तंबाखू कोंबत रमेश म्हणाला.
मीच कहाले जातो रे बावा पायदल आता! म्या तं कीतीरोजचं सोळून देल हाय पायदल जानं! आपून तं आता एसटीशिवाई कुठीच जात नाई! जनवारं खामगावच्या बजारात न्याचे व्हते मनूनशानी जावा लागलं गळ्या पायदल! तेबी आता कीती वर्सानं गेलो! ढोरंवासरं थोडीच नेता येतात काई एसटीनं!
जोळ हाय का राजा खामगाव अठून? तुमी व्हते मनून गेले, मी तं गेलोय नसतो इतल्या दूर! खुशीनाम एखांदी चारशेसात सांगतली असती भाड्यानं. जाऊ गेलं तं, भाडंच जाईन सायाचं! फालतूचा तरास काय कामाचा हो राजा! ..एक पिचकारी मारुन ओठातली तंबाखू जिभेनं दाबत रमेश बोलत होता.
इतले पयशे असते तं ढोरं इकले असते का रे बावा! दुस्काळ तं सायाचा पिच्छाच सोडून नाई रायला! निरा येते ते वर्ष सारकंच येते शिनालचं! अंवदा तं बावा ढोरायले चाराय नाई रे, सांग आता ढोरंवासरं कशे जगवाव! काय खाऊ घालावं त्यायले हा मोठा परसन पडेल हाय! मनून तं ईका लागली गाय मले! नाईतं लेका गाय इकली असती रे म्या! लेका, माये सर्वे लेकरं तिच्या दूधावरच लहानाचे मोठे झाले. आताय माया लायन्या पोरायले दूध लागतेच! तरी इका लागून रायली गळ्या गाय! गाईसोबत कारोडबी द्या लागली बॉ, काय करशीन? दूध तुटलं नोत ना तिचं आजून! नाईतं ठुयली असती कारोड घरी, पायलं असतं कसयबी तिचं एकलीचं चारापान्याचं! दुधाच्यानं रायत नोती वासरी! जाऊ दे आता काय कराव सालमानच तसं हाय, त्याले आपून तरी काय कराव! माये पोट्टेसोट्टे तं लेका लयचं लडत जात गाय न्याच्यायेळेस! निरा गाईच्या गयात पडूनच लडत जात लेका लेकरं! मी तं दंग झलतो सायाचं! म्हणलं फोकनीचं उलसक पानी कधी पडलं असतं तं काय झालं असत! निदान ढोरायले चारा तरी रायला असता! गाय इक्याचं काम नसतं पळलं! पिकं नाई आले समजा, तरी मानूस तं काई मरत नाई, पन जनवारायचं थोडीच व्हते रे बॉ! माया तं कायजाचं पानी पानी झाल्तं गड्या लेकरं लडत जात तवा! लेका मा पोरगा तं तुले सांगतो, त्या कारोडच्या गयातच पडत जाये! अन मले मने बाबा नेऊ नोका ना इक्याले आपल्या गाईले! त्याचा अकात पाऊन बायको आली बॉ आरतीच ताट घिऊन, झालं तिनं गाईच्या खुरायवर पानी टाकलं अन लागली हो बॉ हुंबळल्ले दिऊदिऊ लळ्याले! आरतीचं ताट रायल बाजूले! इचं बोेंबलनंच झालं चालू! मंग बॉ कसं तरी तिले समजावलं, मंग तिनं कुकू लावलं गाईले, आरती केली. पूजा करून निघालो कसातरी घरून! त्यायचा अंकात पावून मले बी लडू येत जाये सायचं, पन माणसाच्या जातीले थोडीच लडता येते काई! बाईची जात तरी कसंयबी लडून आपलं मन हलकं करते. आपल्याले तं तसंबी करता येत नाई, कराव तं काय कराव!
तुमचं लाख खरं हाय राजा मामा, आपून जनवारं वागवतो, त्यायले निरा लेकरावानी जीव लावतो, इकतांनी तरास तं व्हतेच राजा! पन सालमानचं तसं आलं त्याले काय कराव! ते का आपल्या हातचं हाय! अवंदा असं वाटलं व्हतं की बॉ पानीपाऊस भरपूर अशीन, सर्व यवस्थित हून जाईन, तं कहाचं काई राजा अवंदा तं लयचं बेकार दिवस दाखवले बावाजीनं! .. तंबाखू थुकत रमेश बोलून गेला.
काय चालू हायेत हो मामा भाश्यायच्या गोष्टी! लय टायमापासून पाऊन रायलो मी तुमाले! बयलायचं शेण काळलं, त्यायचं चारापानी केलं, तरी तुमच्या गप्पा काई सरुन नाई रायल्या, मनलं आपूनबी आयकाव बॉ काय हात एवळ्या गोष्टी चालू तं! ..अवधूत भनके आल्याबरोबर बोलू लागला.
तुमची तं बावा बजाराची थयली सट्ट भरेल दिसून रायली. भाजीपाला पानसुपारी डचांग भरेल हाय बापा थयली. दोरंगीरं हायेत हाती! गाय नेल्ती काय इक्याले?
हवं ना हो राजा, घरी जाऊन रायल्तो तं हा गळी रमेश दिसला मनून बसलो बोलत! आता घरी बी जायाचं मन नाई हून रायलं! घरी गेलं तं गाईचं कोठं रिकामं अशीन. पोट्टे इचारतीन, इकली काय गाय! त्यायले काय सांगाव!
तुमी काय पयले हा का गावातले जनवारं इकनारे वासुदेव बॉ! दरमंगयवारी तीन चार जनवारं जातात आपल्या गावातून खामगावच्या बजारात! आपून थोडीच हाशीखुशीनं इकून रायलो त्यायले. जनवारं इकनं मंजे आपलं कायीज इकनं हाय आपल्यासाटी! पन देवाजीच्या मनी तसंच लिवेल अशीन तं ते कोन पुसून काळीन सांगा ना मले! माया घरी खंडीभर जनवारं व्हते की नाई, तुमीच सांगा! म्या सरे इकले बॉ! आता बयीलजोळीच हाय! आता ते लागीनच की नाई किस्तकारीले! तेबी इकसान तं आपल्याच्यानं घेतल्या जातात बयील डबल! मनून मन्लं जसं व्हईन तसं हू द्या, पन बयील नाई इक्याचे! कुटार हाय बंम जमा करुन ठेवेल, जितल्या दिवस पुरीन तितल्या दिवस पाऊन घेतो, जवा सरीन तवा पाऊ काय कर्‍याचं तं! ..तोंडातलं पान चावत दाताला चुन्याचं बोट लावत अवधूत भनके म्हणाला.

मी तं मामाले तेच सांगून रायलो राजा तवाचा! त्यायले मन्लं तुमी नोका टेन्शन घीऊ, आपून वाचतो की मरतो ते पा अवंदा! ..दाताच्या फटीतली तंबाखू काढत रमेश म्हणाला.
केवळ्याले गेली मंग गाय, वासरी व्हती ना वाटते तिले! दूध देत जाये काय आजून हो तुमची गाय? अवधून भनकेनं विचारलं.
तीन तीन लिटर दूध कुठीच गेलं नाई ना हो सकाऊन संध्याकाई! मायी गाय राजा इतली गरीब व्हती तुमाले सांगतो, कोनालेबी बसवा दूध काढ्याले, दूध तितलंच दिन! असं नाई का बॉ दुसरा मानूस बसला मनून दूध देनार नाई! कोनालेबी दूध काढू देत जाये बिचारी! माले लेकरं तं तुमाले सांगतो त्या गाईच्या आंगावर खेवत जात, पन तिनं कयीच शिंग नाई मारलं, का काई नाई केलं. गाय मंजे गायचं व्हती राजा, आता तुमाले काय सांगाव! इकतांनीबी म्या पयशायले नाई पायलं. खाटके फिरुन फिरुन येत जात माग भावानं मांगत जात, पन म्या नाई देली त्यायले! एक आपल्यासारका आला लेकराबाकरायवाला, तो मने की बॉ माया लेकरायले दूधासाटी पायजे गाय, मंग म्या पयशायचा इचारच नाई केला. त्यालेच टाकली इकून! मनलं बावा या गाईले इकनार नोतो पन आता दुस्काळाच्यानं इकून रायलो, खाटक्याले दयापेक्शा तु वागवनारा हायेस, तु कमी दे पयशे, पन गाईले चांगलं वागोजो! त्यानं मले मंजे लयच समजावून सांगतलं, निरा घरच्या सारकंच! मने तुमी कायजीच नोका करु, असं समजा तुमच्याच घरी हाय तुमची गाय! मनून शांत डोक्शानं घरी आलो नाईतं मले झोपच येत नोती राजा!
तसंच चिवत्या बनवतात हो ते मानसाले राजा! खामगावच्या बजारात का आमी आजचे जाऊन रायलो का? बेपारीच काय करतात, तुमच्याजोळ येतात, तुमच्यासोबत भाव करतात, मंग त्यायचाच मानुस पाठोतात, सांगतात वागोनारा हाव, मानसाचा भरोसा जिकतात, एकदा भरोसा जिकला की बेभाव जनवारं घेतात. बेपार्‍यायचीच शाळा असते ते सर्वी! इतला दुस्काळ हाय लोकं जनवारं इकून रायले अन कहाले कोनी वागवनारा घेते हो ढोरं राजा! बेपार्‍यायचेच लोक असतात सर्वे! ..बोलताना अवधूत भनकेनं पानाची लाल पिचकारी उडवली.
अरे बापरे, मंजे मलेबी फसोवलं वाटते मंग त्यायनं, हायना! मंजे माई गायबी बेपार्‍यायनंच घेतली अशीन मंग तं? अरेरे..निसर्गाच्या दुस्काळासोबत मानुसकीचाबी दुस्काळ सुरू झाला म्हना लागीन आता तं, राजा! बोलताना पानाच्या पिकाची लाली त्यांच्या डोळ्यात रक्त गोठल्यागत चढली होती. थरथरत्या हातांनी बाजाराची पिशवी खांद्यावर घेऊन जड अंतकरणाने वासुदेव मामा घराच्या वाटेने निघाले होते.
© पत्रकार संदीप अंभोरे

बंदिनी

देवळातल्या काकड आरतीचे पवित्र सूर आणि टाळ मृदुंगाच्या मंजुळ गजराने मीरा जागी झाली होती. फुलांच्या माळांनी सजवलेल्या पलंगावर राजेश निवांत झोपला होता. तिने हळूच त्याच्या अंगावरची चादर व्यवस्थित करुन फुलांच्या माळा काढून ठेवल्या. उठल्यावर तिने देवपूजा करुन सासू, सासरे आणि दिराला चहा, पोहे दिले. सुनेच्या येण्याने घरात चैत्यन्याचं वातावरण होतं. सासू, सासर्‍यांसह सर्वच जण आनंदात होते.
मीराला सारखी माहेरची आठवण येत असल्यामुळे तिने स्वतःला कामात गुंतवून घेतलं होतं. घरातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत तिने लक्ष द्यायला सुरुवात केली होती. घरातील अस्ताव्यस्त सामानाला व्यवस्थित करणं, ठेवणीतली भांडीकुंडी घासून परत माळ्यावर ठेवणं यासारख्या घरातल्या कामात मीरा रममाण झाली होती.
दिवसामागून दिवस जात होते. मात्र, राजेश स्वतःहून तिच्याशी कधीच बोलत नव्हता. ना तिला कधी काही विचारत होता. रात्री तिला सोडून आईजवळ जाऊन झोपायचा. त्याला काही विचारलं तर आईला विचारुन सांगतो म्हणायचा. एकदम विचित्र पध्दतीने राजेश तिच्याशी वागत होता.
रोजच्या या प्रकाराने कंटाळून त्याला जाब विचारायचं ठरवून एका दिवशी तिने त्यांच्या खोलीत प्रवेश केला. तेव्हा तिला बघताच तो थोडा चपापला. तरीही मीराने विश्वासात घेऊन त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. नेहमी तुम्ही माझ्यापासून लांब का राहता? माझं काही चुकतंय का? की तुम्हाला मी पसंत नाही? तुमच्या मनात काय चालू आहे नेमकं काहीच कळत नाही! मला समजू तरी द्या नेमकं काय आहे तुमच्या मनात?
मीरा हे सगळं बोलत असताना राजेश फक्त तिचं ऐकून घेत होता.
आजचा दिवस चांगला उजाडेल, उद्या काहीतरी बदल घडेल या आशेवर ती जगत होती. आला दिवस सारखाच जात होता. राजेशमध्ये कुठलाही परिणाम नव्हता. दिवसागणीक तिने रंगवलेल्या सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी होऊ लागली होती. घरातील या सगळ्याचा परिणाम तिच्या वागण्यावर जाणवत होता. दिवसेंदिवस मीराच्या स्वभावात चिडचिडपणा वाढला होता. याबाबत तिने तिच्या सासूला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला असता सासूनं सांगितलं, तो लहापणापासूनच लाजराबुजरा आहे. सासुच्या बोलण्यामुळे मीरा थोडी सावरली खरी मात्र त्यानंतर काही दिवसांतच राजेश गतीमंद असल्याचं तिच्या लक्षात आलं. याबद्दल तिने सासू सासर्‍यांना विचारलं असता त्यांनी कबुल केलं की, लग्नाआधीच डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की, राजेश गतीमंद असण्यासोबतच नपुंसकसुध्दा आहे म्हणून. या सगळ्या गोष्टींची कल्पना असताना त्यांनी ठरवून मीराची फसवणूक केली होती.
तिला खरं कारण कळल्यानंतरही सासरच्या लोकांनी चूक मान्य न करता उलट तिचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तिच्या सासूने तिला प्रलोभने दाखवली. भावनिक साद घालून बघितली, म्हणाली, मीरा, लोकांना जर आपल्या घरातील प्रकरण कळलं तर लोक काय म्हणतील? काय विचार करतील? आम्हाला तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही समाजात! तू म्हणत असशील तर चार रुमचं घर तुझ्या नावावर करते. तुला कशाचीच कमी पडू देणार नाही आयुष्यभर! आपण एक छानसं बाळ दत्तक घेऊ! घरात तुझा दीर आहे. मी आणि तुझे सासरे आम्ही सगळेच तर आहोतच तुझी काळजी घ्यायला! तू फक्त माझ्या पोराला सांभाळून घे!
चार खोल्यांचं घर तुझ्या नावावर करतो, तुझा दीर आहे सांभाळायला हे सासूचे शब्द ऐकून मीरा हादरून गेली होती. स्वार्थासाठी लोकं किती खालच्या थराला जातात याचा प्रत्यय तिला आला होता. खोट्या प्रतिष्ठेसाठी मिरासोबत एकप्रकारचा सौदा करण्याचा प्रयत्न तिची सासू करण्याचा प्रयत्न करू पाहत होती. मात्र, सासूने सांगितलेल्या पर्यायांमुळे मीराच्या पायाखालची जमीन सरकली होती. या अचानक ओढवलेल्या प्रसंगाने तिच्यावर दुःखाचं आभाळ कोसळलं होतं. मात्र, आयुष्याची घुसमट करून घेण्यापेक्षा परिस्थिती स्विकारुन घटस्फोट घेण्याचा निर्णय मीराने घेतला.
वर्षभरातच राखेतून भरारी मारुन तिने आयुष्यात आलेल्या वादळावर नियंत्रण मिळवलं. स्वतःला गुंतवण्यासाठी तिने नोकरी करायला सुरुवात केली. घटस्फोट घेऊन वर्ष उलटलं होतं. झाली होती. मीरा आता बर्‍यापैकी स्थिरस्थावर झाली होती. दुसरीकडे तिचे आई-वडील तिच्या लग्नासाठी स्थळं बघत होते. मात्र घटस्फोटीत असल्यामुळे चांगली स्थळ येत नव्हती. दोन, दोन मुलांचे बाप तिला बघायला येत होते. दरम्यानच्या काळात तिच्या आयुष्यात एक तरुण आला होता. परंतू तो स्वजातीय नसल्यामुळे त्यांचं लग्न होणं अशक्य होतं. याची तिलाही कल्पना होती. तरीही तिने याबाबत घरच्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. घरुन मात्र स्पष्ट शब्दांत नकार मिळाला होता. एवढंच नव्हे तर, तुला जर हे लग्न करायचं असेल तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील, असं सांगण्यात आलं.
त्या मुलाचा विषय समजल्यामुळे घरात तिची मनःस्थिती कोणीच समजून घेत नव्हतं. तुझ्या नशिबात जे लिहिलेलं होतं ते घडलं. त्याला आम्ही तरी काय करु शकतो, असं म्हणून घरचे लोक जबाबदारी झटकत होते. घरातही सगळे जण तिला टाळण्याचाच प्रयत्न करत होते. तिचे आई वडील तिला विरोध दाखवत नव्हते. मात्र, तिचा भाऊ तिला घराचे दरवाजे बंद करण्याची भाषा बोलत होता, तेव्हा त्याला गप्प करण्याचं कामसुद्धा त्यांनी कधीच केलं नव्हतं. ती अधून मधून आईसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होती. कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत होती. पण तिने विषय काढला की, तिची आई काही तरी कारण सांगून तिथून निघून जात होती. तिला सारखं वाटत राहायचं निदान आई तरी समजून घेईल.
एक दिवस घरात सगळे असताना या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचाच या इराद्याने तिने पुन्हा लग्नाचा विषय काढला. आई-बाबा, आजपर्यंत तुमच्या निर्णयापुढे जाऊन मी कधीच काही केलं नाही. तुम्ही म्हणालात त्या मुलाशीच काहीही न बोलता लग्न केलं. मला आजही तुमच्या मनाविरुद्ध काहीच करायचं नाही. ठरवलं असतं तर पळूनही जाऊ शकलो असतो आम्ही! पण नाही, करायचं तर तुमच्या परवानगीनेच, असं आमचं दोघांचंही मत आहे. पण खरं सांगू आई, बाकी कोण नाही पण तू तरी माझं एकून घेशील, असं मला वाटलं होतं! भलेही तू होकार नव्हता द्यायचा लग्नाला, पण नकार तरी द्यायला पाहिजे होता अधिकारानं! तू एकदा अधिकारवाणीनं सांगितलं असतस की, नको करुस लग्न म्हणून! तरीही मी हसत हसत निर्णय घेतला असता! निदान तो अधिकार तू दाखवायला पाहिजे होतास!
बोलताना मिराच्या डोळ्यात टचटचून अश्रू आले होते. मिराची अवस्था बघून तिच्या आईनं तिला जवळ घेतलं. तिचे अश्रू आपल्या पदराला पुसले आणि म्हणाली, बाळा, कोणाच्या मायबापाला मुलांचं वाईट झालेलं आवडेल मला सांग! आम्ही जे काही केलं, कठोर वागलो, त्यात आमचा काहीच स्वार्थ नव्हता.
एक गोष्ट लक्षात ठेव मीरा, तुझा बाप म्हणून जे माझं कर्तव्य होतं ते मी अगदी योग्य पद्धतीनं पार पाडलं. मुलाचं घर-दार व्यवस्थित बघून तुझ्या सुखाची खात्री झाल्यावरच मी तुझं लग्न ठरवलं होतं पोरी, पण हे असं काही होईल याचा मी विचारच केला नव्हता! आम्ही पालक म्हणून आजपर्यंत तुझ्या भल्याचाच विचार केला आणि यापुढेसुद्धा करू!
बाबा, जे झालं त्याच्याबद्दल मी तुम्हाला दोष देत नाही आणि देणारही नाही! घरात संवाद नसल्यामुळे माझी घुसमट होते त्याबद्दल माझी नाराजी आहे. माझं म्हणणं कोणी ऐकत नाही, मत कोणी विचारात घेत नाही! मग प्रश्न असा पडतो मला की, माझ्या भावना मी कोणाकडे व्यक्त करू! या निमिताने घरात चर्चा व्हायला लागली याचा आनंदच आहे मला! आता विषय निघालाच आहे तर तुम्हाला सगळ्यांना सांगते, जेव्हा घरात कोणीच किंमत देत नव्हतं, तुझ्या नशिबात होतं ते झालं, असं म्हणून जबाबदारी तुम्ही झटकत होते सगळे तेव्हा हाच मुलगा मला समजून घेत होता! इतकच नाही तर धीर देत होता! असाही माझा दृष्टिकोन सगळ्याच लोकांबद्दल बदललेला होताच! जगातली कुठलीच गोष्ट मला तेव्हा चांगली दिसत नव्हती. कोणावरच माझा भरोसा उरला नव्हता, तेव्हा याच मुलाच्या मैत्रीने माझा विश्वास जिंकला! पुढे तो विश्वास अधिक दृढ झाला जेव्हा त्याने आयुष्यात केलेल्या चुकांची कबुली दिली. त्याचे एका दोन मुलांच्या आईसोबत अनैतिक संबंध होते हेही त्यानं प्रामाणिकपणे सांगून टाकलं! जीवनात इतका पारदर्शीपणा पाहिजे की नाही हे मला नाही कळत, पण त्याच्या बोलण्यातील सत्य माझ्या मनात त्याच्यासाठी कायमची जागा करून गेलं! ही व्यक्ती आपल्याला आयुष्यभर सुखात ठेऊ शकते याची खात्री झाल्यावरच मी तुमच्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले. ..एवढं बोलून मीरा थांबली.
घरात एकप्रकारची स्तब्धता आली होती. सगळ्यांच्या नजरा मिराच्या वडिलांकडे होत्या.
मीरा बेटा, तू एवढं सांगतेस तर ऐक, आम्ही तुझ्या सुखाआड कधीच येणार नाही आणि तुझ्या लग्नाला विरोध करण्याचं काही कारणही नाही. फक्त माझी एक अट आहे, ती तुम्हाला मान्य झाली तर मी स्वतःच तुझं कन्यादान करून थाटामाटात तुझं लग्न लावून देईन, हा तुझ्या बापाचा शब्द आहे! बोल कबूल आहे का?
बाबा, तुमच्या अटी आणि शर्थी आमच्या आवाक्यातल्या असतील, अशी अपेक्षा करते! सांगा काय अट आहे!
अट खूप छोटी आहे बेटा! कारण लोकांच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यायची आहेत उद्या! म्हणून मला असं वाटते की, मुलगा जर त्याची जात बदलायला तयार असेल तर माझा लग्नाला होकार आहे. बाकीचं आता तुमच्यावर आहे!
अटीतटीच्या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून मिराची आई उठून स्वयंपाक खोलीत निघून गेली. तिचा भाऊ मुकदर्शक होऊन मिराकडे बघत होता. अचानक आलेल्या प्रश्नानं मीरा गोंधळून गेली होती. घामानं डबडबलेला चेहरा आपल्या ओढणीला पुसत मीरा म्हणाली, बाबा, जशी आपली जात आपल्याला प्रिय आहे, तसेच सगळे लोक आपापल्या जातीला चिकटून आहेत. त्यालाही त्याच्या जातीचं पाणी असणारच, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की, तुम्ही टाकलेली अट कधीच पूर्ण होणार नाही. त्यामुळे आमचं लग्न लावून देण्याची तुमच्यावर वेळच येणार नाही, पण तो तुमचा गैरसमज आहे. आमच्या प्रेमासाठी ही खूप छोटी गोष्ट आहे, तो माझ्यासाठी जातसुद्धा बदलायला तयार होईल, याची मी तुम्हाला खात्री देते!
ठीक आहे मग, लवकरच कागदोपत्री सोपस्कार उरकून घेऊ आणि आपण सगळेच लग्नाच्या कामाला लागू! तुझ्या शब्दाखातर आजच मी सोनाराला दागिने बनवायला सांगून टाकतो!
मिराच्या घरच्यांनीही पारंपरिक पद्धतीने मोठ्या हर्षोउल्हासात मुलीचा विवाह लावून दिला. लग्नानंतर मीरा सासरी म्हणजेच कर्जतला राहायला गेली. तिचं ऑफिस होतं फोर्टला, लांब पडते म्हणून तिने जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. घरसंसारात ती रमून गेली होती. अगदी सुखाने तिचा संसार चालू होता. भाजी आणायलासुद्धा तिला बाहेर पडायची गरज नव्हती. नवरा तिच्या सगळ्याच गोष्टींची काळजी घेत होता. सगळंच तिला जागेवर मिळत होतं. मुळात सुगरण असलेल्या मिराला घरतल्यांना वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालण्यात खूप आनंद मिळत होता.
एक दिवस सकाळीच मिराचा फोन वाजला. काय गं मीरा, एवढी नवर्‍यात गुंतून गेलीस का? की सर्वांनाच विसरून गेलीस! इतकी काय जादू केली नवर्‍याने तुझ्यावर! आम्ही नाही विसरलो गं कोणालाच लग्न झाल्यावर! तू तर बाई नातेवाईकसुद्धा तोडूनच टाकलेस सगळे!
अगं सीमा, थोडा तरी पॉझ घे! किती बोलशील एका दमात! नवर्‍यानं काही जादू वैगरे नाही केली, माझा मोबाईल हरवला लग्नाच्या गडबडीत. त्यात सगळ्यांचे नंबर होते. ते सगळे गेले. मग कसा होईल कॉन्टॅक्ट सांग बरं! याचा अर्थ मी विसरले असा नाही ना गं होत!
बरं बाई, तसंही तू मला बोलण्यात थोडंच जिंकू देणार आहेस? माझ्याकडे तरी तुझा हा नंबर कुठे होता. काकी भेटल्या परवा त्यांच्याकडून घेतला.
अगं बरच झालं तू कॉल केलास, किती महिने झाले, आपण बोललो नाही. बाकी तू बोल कसं चाललंय सगळं!
काही नाही गं रुटीन आहे! मला तर कंटाळा आला सगळ्या गोष्टींचा आता! बरं ते जाऊन दे, शर्मिलाचं लग्न झालं तुझ्या नंतर दोन महिन्यांनी! तिचा फोन आला होता. तुझ्यावर जाम भडकली. म्हणाली माझ्या लग्नाला नाही आली, तिला भेटू दे कधी तरी बघून घेते! ती येणार आहे आज डोंबिवलीला! तुला बोलवायला सांगितलं तिने, म्हणून कॉल केला!
हो गं खूप दिवस झाले डोंबिवलीला आलीच नाही मी पण!
ये ना मग, मस्त फडके रोडवर भटकंती करू! पाणीपुरी, रगडा पॅटिस खाऊ! नंतर तुझ्या आवडीच्या हॉटेलमध्ये माझ्याकडून तुम्हा दोघींना पार्टी, लग्नाची! खूप दिवस झाले यार भेट नाही, मला खूप आठवण आली तुमची दोघींची!
बरं गं बाई, कितीवाजता भेटायचं ते सांग आणि ठिकाण सांग!
एक वाजेपर्यंत ये वेस्टला, एव्हरेस्ट शॉपिंग सेन्टरच्या बाहेर भेट, तिथून जाऊ पुढे! ये गं आठवणीने, वाट पाहते, चल, ठेऊ मग!
हो, चल, मी पण आवरते पटापट!
काय करायचं गं शर्मिला, ही मीरा अजून नाही आली. उभं राहून राहून पाय दुखतायेत माझे! तू येण्याअगोदरपासून जवळ जवळ तासभर झाले असतील, मी उभी आहे इथे!
आपण एक काम करू! ती येईपर्यंत बसून मस्तपैकी कॉफी घेऊ. पिझ्झा ऑर्डर करून ठेऊ. म्हणजे आल्या आल्या गरम गरम खायला होईल.
तसच करूया! इथे पाय दुखवत उभं राहण्यापेक्षा ही चांगली आयडिया आहे. चल तिलाच आपण डायरेक्ट हॉटेलमध्ये बोलवू!
खूप दिवसांनी या हॉटेलमध्ये आलो गं सीमा आपण! पाच सहा महिन्यांतच इथलं सगळं बदललं गं पण! कॅश काऊंटरची जागा बदलली! आपला नेहमीचा टेबल कोपर्‍यात गेला! दिवाळीची खास तयारी चालू आहे वाटते!
काऊंटरवरच्या माणसानं हसून त्यांचं स्वागत केलं आणि म्हणाला, बोला मॅडम, खूप दिवसांनी आलात! ये कोण आहे रे तिकडे या टेबलवर पाणी दे मॅडमला!
दादा, एक काम करा, आमची एक फ्रेंड येणार आहे तोपर्यंत आमच्यासाठी एक पिझ्झा बनवायला सांगा आणि आता दोन कॉफी द्या!
दोन नाही गं तीन कॉफी मागव!
अरे बापरे, मीरा, तुला कसं कळलं आम्ही इथे आहोत ते! आम्ही फोन करायच्या आधीच हजर!
मला तुमच्या सगळ्या जागा माहीत आहेत! ठरलेल्या ठिकाणी नाही म्हटल्यावर, तुम्ही कुठे असू शकता याचा अंदाज होताच मला!
हो बाई, तुला आमचं सगळंच माहीत आहे! बरं आता थकली असशील, बसून पाणी पी आधी, मग बोलू!
शर्मिला, हळदीचा रंग उतरलेला दिसत नाही अजून तुझ्या चेहर्‍यावरचा? ..मिराने मिश्कीलपणे विचारलं.
तुझं आपलं काहीपण हं मीरा, चार महिने राहते काय गं हळद अंगावर?
मस्करी केली गं, एवढी काय चिडतेस!
माझा राग तर आहेच तुझ्यावर, शहाणे, लग्नाला नाही आलीस ना माझ्या!
नाही जमलं गं, पण जाऊ दे प्रायश्चित्त म्हणून आजचं बिल मी देते!
मीरा, बिल दिल्यानं तुला माफी नाही, ठरल्याप्रमाणे बिल मीच देते!
तू खूप पैसेवाली आहेस सीमा, माहीत आहे मला! दे बाई!
मीराबाई, मग कसा आहे लवम्यारेजचा अनुभव! ..शर्मिलाने विचारलं.
सारखच असते गं, लवम्यारेज केलं म्हणजे काय जगावेगळं केलं काय गं मी काही!
आमचं अरेंज आहे ना म्हणून कुतूहल आहे गं लवम्यारेजचं!
एकदा लग्न झालं की सगळं बदलून जाते गं! मग काही राहत नाही वेगळेपण! संसार तर सारखाच असतो लवम्यारेज आणि अरेंजवाल्यांचा!
मीरा, बरं चाललय ना सगळं? आता तर कुठे सुरुवात आहे. इथूनच निगेटीव्ह विचार करतेस म्हणून विचारलं!
निगेटीव्ह नाही गं बोलत सीमा मी! खरं तर मी खूप सुखात आहे! कशाचीच चिंता नाही मला! भाजीपाला, किराणापासून जे पाहिजे ते जागेवर मिळते मला! सगळं नवरा आणून देतो, आपण फक्त ऑर्डर द्यायची! हुकुमाचा ताबेदार नवरा आहेच! सासरचे लोकही खूप जीव लावतात, अगदी स्वतःच्या मुलीसारखा!
मग अजून काय पाहिजे मॅडम? शर्मिला डीवचण्याच्या स्वरात म्हणाली.
सगळं असेल तुमच्या आजूबाजूला पण तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता ती व्यक्तीच पुढे बदलली तर त्या भौतिक सुखाला काय अर्थ आहे?
आम्हाला समजेल असं बोल बाई, स्पष्ट शब्दांत सांग काय ते?
अगं मला सांग, नवर्‍याच्या पॉकेटमध्ये दुसर्‍या बाईचे फोटो दिसत असतील तर कसं वाटत असेल मला?
त्यात काय? असेल कोणी मैत्रीण! एवढं संकुचित असणं बरं नाही!
नाही गं सीमा, दोन लेकरांची आई आहे ती बया! त्याचं आधीपासूनच अफेअर होतं तिच्याशी! एकादिवशी मला ते फोटो दिसले म्हणून मी विचारलं तर मलाच मारहाण केली! तेव्हापासून फोटोचा विषय काढला की, तो मला मारतो! एवढं होऊनही पाकिटातून त्याने फोटो काढले नाहीत! प्रेमाखातर स्वतःची जात बदलणारा माणूस जर पुढे असा वागत असेल तर त्याच्या इतकं दुःखद काय असू शकते?
शॉकिंग आहे तुझ्या नवर्‍याचं वागणं!
सीमा, काही शॉकिंग वैगैरे नाही आजकालची मुलं अशीच आहेत! आपण कितीतरी बघतो! विषय निघालाच आहे तर माझंच उदाहरण सांगते, माझ्या नवर्‍याचं वागणं पण विचित्र आहे गं! त्याची पुतणी आहे! असेल वीसेक वर्षांची! तिला म्हणे, लहानपणापासून लाडात वढवलंय याने! म्हणून त्याचा खूप जीव आहे तिच्यात! इथपर्यंत ठीक आहे. सकाळी आम्ही दोघे कामावर जातो! दिवसभरात एखादा फोन करायचा ना बायकोला, तर अजिबातच नाही! तिला मात्र तासाभरातून एक तरी फोन असतोच असतो! पोहोचलीस का? जेवलीस का? असं सगळं चालू असते! माझा त्यांच्या नात्यावर संशय नाही पण किमान माझ्याकडे थोडं तरी लक्ष द्यावं ना! संध्याकाळी घरी गेलं तर माणूस टीव्ही बघत बसलेला असतो आणि आपण किचनमध्ये गुंतून जातो! संवाद नावाचा प्रकारचं नाही आमच्यात! पण काहीही असो त्याचं तिच्यासोबतचं वागणं नाही पटत माझ्या मनाला!
सोडा गं बायांनो, घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ते काही खोटं नाही, पण चुलीसुद्धा आता कमीच झाल्यात नाही का गं! गावाकडेही गॅस आलेत आता! ..सीमाच्या बोलण्याने तिघीही हसायला लागल्या. वातावरण हलकंफुलकं झालं.
सीमा, तुझं काय गं, चार वर्षे झाली लग्नाला अजून काही गुड न्यूज नाही! प्ल्यॅनिंग चालू आहे का? पैसे जमवण्याचं! दोघे दोघे कमावता, कुठे ठेवाल एवढे पैसे?
तू समजतेस तसं काही नाही गं मीरा! मुल होत नाही हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे माझ्या लाईफमधला! या चार वर्षांच्या संसारात सौख्य म्हणजे काय असते हे मला माहीतच नाही पडलं! सकाळपासून सासूचे टोमणे चालू होतात. आम्ही किती दिवस दुसर्‍यांची मुलं सांभाळायची! मरायच्या आधी नातू बघायची इच्छा आहे. पण हिला मुल होईल, असं वाटत नाही. पोराला दुसरी बायको करून द्यावी लागते की काय? असं म्हणते सासू माझी! मला सांग, दोष नवर्‍यात असेल तर मुल होईल कसं?
आपल्या इकडे कसं आहे एखाद्या बाईला मुल झालं नाही की, त्यासाठी सर्वस्वी दोषी तीच असते. असा विचात कोणीच करत नाही की, दोष नावर्‍यातही असू शकतो म्हणून! आमचं लग्न झाल्याच्या वर्षभरानंतरच डॉक्टरांनी त्याला स्पर्म काऊंट कमी असल्याचं सांगितलं होतं! तुम्हाला मुल हवं असेल तर वाट बघावी लागेल आणि औषधं घ्यावी लागतील, असं सांगितलं होतं. हे सगळं माहीत असूनही मी संसार करत आहे त्याला काहीच किंमत नाही का? माझ्या त्यागाला काडीचीही किंमत नाही का?
सीमा, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तू काय त्यागाच्या गोष्टी करत बदलीयेस, हे माहीत झालं तेव्हाच निर्णय घ्यायला पाहिजे होतास तू?
आता तर तसच वाटायला लागलं गं! कारण जो येतो तो माझ्यावरच अविश्वास व्यक्त करतो. माझ्यातच प्रॉब्लेम आहे अशा नजरेनं बघतो माझ्याकडे, मला तर वीट आला या सगळ्यांचा! माझीसुद्धा मजबुरी आहे गं! आईवडलांनी आयुष्याची जमापुंजी माझ्या लग्नाला लावली. मग कुठल्या तोंडाने लग्न मोडून त्यांच्याकडे जाऊ! डॉक्टरांनी सांगितलंय ना होईल सगळं व्यवस्थित म्हणून मीसुद्धा होप्स अजून सोडलेल्या नाहीत!
सीमाची करुण कहाणी ऐकून मीरा आणि शर्मिलाने दीर्घ श्वास घेतला. कॉफी थंड झाली होती. टेबलवर ठेवलेला पिझ्झा तसाच पडून होता. सीमा हळूच उठून डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा चोरून पुसत होती. इतक्यात शर्मिलाची नजर हॉटेलच्या दरवाजातून आत येणार्‍या एका तरुणीकडे गेलं. अगं ती बघ, कविता येत आहे.
कोण कविता गं, शर्मिला! ..मिराने विचारलं.
सीमाची मैत्रीण!
हो गं, ही कशी काय इकडे? मीरा म्हणाली.
अय्या, तुम्ही तिघी अशा भेटाल असं वाटलं नव्हतं गं! सीमा तर किती वर्षानंतर भेटत आहे. कशी आहेस, सीमा?
मी छान, तू कशी आहेस?
माझं पण मस्त चालू आहे? इथे मावशीचे पोळीभाजी केंद्र आहे ना! तिला मदत करतेय सध्या! इकडे रोज पन्नास पोळ्या द्यायच्या असतात ना, त्याच घेऊन आली होती.
का, तुला तर विरारला दिलय ना! आई सांगत होती. सीमा म्हणाली.
हो गं ती खूप मोठी कहाणी आहे. सांगेन कधीतरी!
बोलत असतानाच तिने हातातल्या पोळ्या काऊंटरवर दिल्या. सीमानेही काऊंटरवर बिल दिलं.
चला, बाहेर जाऊन बोलूया, कविता म्हणाली.
असं काय झालं कविता की तुला पोळीभाजीचं काम करावं लागत आहे. सीमानं विचारलं.
काही नाही गं, माझं लग्न झालं हे खरं आहे, पण लग्न फार काळ टिकलं नाही!
फार काळ टिकलं नाही म्हणजे? सीमानं विचारलं.
म्हणजे तीनच महिन्यात नवर्‍याने मला माहेरी आणून सोडलं!
तीनच महिन्यात? तीघींही एका सुरात म्हणाल्या.
होय, माझ्या पाठीवर लहानपणापासूनच एक डाग आहे. डॉक्टरांनीही तो नॉर्मल असल्याचं सांगितलेलं आहे! पण माझा नवरा म्हणतो की, त्या डागामुळे मी तुला सांभाळणार नाही! त्याच्यामुळे त्याने मला इकडे आणून घातले. आता तर तो म्हणतो तु मला पसंत नाहीस म्हणून!
अरे बापरे हा तर भयानक प्रकार आहे! सीमा ओरडून म्हणाली.
हो भयानक प्रकार तर आहे. यामुळे थोडे दिवस मी रडत बसले, पण आता मी ठरवलंय की, मावशीला पोळी भाजी केंद्रात मदत करायची आणि ते करत असतानाच आपला स्वतःचा गृहउद्योग उभा करायचा! हा माझा संकल्प आहे!
छान, वाटलं कविता तुझा संकल्प ऐकून. अशीच पुढे जा! ..मीरा म्हणाली.
खूप छाप वाटलं गं तुमची भेट झाल्यामुळे! अरे बापरे, खूप उशीर झालाय तुमच्यासोबत बोलत असले, मावशी तिकडे वाट पाहत असेल, चला गं येते मी, पुन्हा भेटू केव्हातरी, असं म्हणून कविता लगबगीनं निघून गेली.
तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे तिघी जणी बघत होत्या. मध्येच मिराने दोघींना विचारलं काय गं काय बघताय तिच्याकडे? काही शिकलात की नाही कविताकडून! तिघीही खळखळून हसल्या आणि एका सुरात म्हणाल्या, आता रडायचं नाही, लढायचंऽऽ
© पत्रकार संदीप अंभोरे