शिस्तप्रिय भाजप नेत्यांच्या भाषेचा स्तर का खालावतोय?

संदीप अंभोरे
ठाणे : भाजपच्या नेत्याची बोलण्याची एक शैली होती. कमीत कमी शब्दांत व्यक्तीगत पातळीवर टीका टिप्पणी न करता आपला मुद्दा मांडण्याचे एक कौशल्य होते. मात्र, अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात भाजप नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि घसरलेला भाषेचा स्तर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे, प्रसाद लाड, राम कदम, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या आदी भाजप नेते वैयक्तिक पातळीवर विरोधकांवर टीका करण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे सुसंस्कृत अशी प्रतिमा असलेल्या भाजपची वाटचाल राडा संस्कृतीकडे चालू झाली का? अशी चर्चा आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या भाषेत टीका केली, ती भाषा शिस्तप्रिय असलेल्या भाजपला मान्य आहे का? अशी चर्चा राज्यभरात आता होऊ लागली आहे.
बुधवारी गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर जहरी टीका केली. त्यानंतर गुरुवारी ना. राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं, मात्र यावेळी राणे यांनी वापरलेली भाषा एखाद्या पक्ष्याच्या प्रमुखासाठी वापरणे योग्य आहे का? असा सवाल आता लोक विचारू लागले आहेत.
राणे यांच्या भाषेबद्दल शिवसेनेने जाहीर नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे जाहीर केले. मात्र अद्याप राणे यांच्या भाषेबद्दल भाजपमधून स्पष्टीकरण आलेले नाही. याचा अर्थ अनुशासित पक्ष असलेला भाजप राणे यांच्या भाषेचे समर्थन करते का? असाही सवाल उपस्थित होत आहे.
नळावरील भाडणाप्रमाणे राज्यातील काही लोकप्रतिनिधी आज भांडताना दिसतात. हात तोडा पाय तोडा, चुन चुन के मारेंगे, कानाखाली वाजवा, अंगावर आले तर शिंगावर घेणार, अशा प्रकारे गुंडगिरीची भाषा शिंदे गटाच्या आमदारांनी वापरल्याचे अख्या महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतरही भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या आमदारांवर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शिस्तप्रिय भाजपला देशात नवी राडा संस्कृती रुजवायची आहे का? असे जाणकार आता विचारू लागले आहेत.

कोण उद्धवजी? उद्धव…
पत्रकार परिषदेत ‘उद्धवजी ठाकरे’ म्हणत पत्रकाराने राणेंना प्रश्न विचारला असता कोण उद्धवजी…? कोण उद्धव ठाकरे…? उद्धव… उद्धव म्हण, मूर्ख माणूस आहे, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना सन्मान देण्यास विरोध दर्शवला. मात्र एखाद्या केंद्रीय मंत्र्याने सार्वजनिकरित्या एखाद्या व्यक्तीबद्दल अरेतुरेची भाषा वापरावी का? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे.

‘थांब रे तू, मध्ये बोलू नकोस’
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूण येथील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरुन त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. अधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांनी प्रवीण दरेकर यांना ‘थांब रे तू, मध्ये बोलू नकोस’ अशी एकेरी भाषा वापरली होती. त्यांच्या या वक्तव्याचीही राज्यभर चर्चा झाली होती.