शिवभोजन थाळीला लोकांची पसंती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या ‘शिवभोजन योजने’ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यात १३९ शिवभोजन केंद्रे सुरु झाली आहेत. प्रजासत्तादिनी योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसांच्या कालावधीतच म्हणजे २ फेब्रुवारी २०२० पर्यंतच शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या १ लाखांहून अधिक झाली होती. आता ११ फेब्रुवारीपर्यंत त्यात आणखी एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांची वाढ झाली आहे. या १७ दिवसांच्या काळात राज्यात २ लाख ३३ हजार ७३८ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याचे दिसून आले आहे.
शिवभोजन योजनेत जेवण देतांना स्वच्छता, टापटीप आणि जेवणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी मुख्यमंत्री ठाकरे स्वत: या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत. शिवभोजन केंद्रातून नागरिकांना चांगले आणि सकस जेवण मिळावे यासाठी ते आग्रही आहेत. याच उद्देशाने त्यांनी काही दिवसांपूर्वी योजना सुरु झाल्यानंतर शिवभोजन केंद्रात जेवण घेत असलेल्या नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून थेट संवाद साधला होता. जेवणाबाबत समाधानी आहात का, जेवणाची चव व्यवस्थित आहे का, काही सुचना असल्यास मनमोकळेपणाने सांगण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले होते. त्यावर जेवण खुप छान आहे. गोरगरीब जनतेची भूक भागवून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे काम तुम्ही करत आहात, अशी प्रतिक्रिया योजनेतील थाळीचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली होती.
जिल्हा रुग्णालये, बस तसेच रेल्वे स्थानक परिसर, शासकीय कार्यालये, इ. ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत त्यामुळे गरीब आणि गरजू लोकांना, मजूरांना याचा लाभ घेणे शक्य झाले आहे. दरदिवशीच्या थाळींच्या संख्येत वाढ होतांना दिसत असून पहिल्या दिवशीची ११३०० थाळींची संख्या आता १४६३९ वर पोहोचली आहे.
या थाळीची किंमत शहरी भागात ५० आणि ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. परंतू लाभार्थ्याला फक्त १० रुपये देऊन जेवणाचा अस्वाद घेता येतो. उर्वरित फरकाची रक्कम अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून अनुदान स्वरूपात संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना आणि मुंबई आणि ठाण्यासाठी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांना देण्याची तरतूद योजनेत आहे.

शिवभोजन थाळीचे नाव योग्यच!

शिवभोजन केंद्रातील स्वच्छता, जेवणाचा दर्जा, पाहता या योजनेतील थाळीला ‘शिवभोजन थाळी’ हे नाव योग्य असल्याची चर्चा लोक करताना दिसून आले. नावाप्रमाणेच जेवणाचा दर्जा आहे. मात्र या योजनेची गत झुनका भाकर योजनेप्रमाणे होऊ नये, अशीही लोकांची अपेक्षा आहे. कारण शिवभोजन हे नाव जरी आज या योजनेतील जेवणाच्या दर्जामुळे सार्थ ठरले असले तरी भविष्यात जेवणाचा दर्जा राखण्याचे आव्हान सरकार समोर असणार आहे. ही योजना प्रायोगिक तत्वावर चालवली जात असल्यामुळेच जेवणाचा दर्जा चांगला ठेवण्यात येत असल्याचही चर्चा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल गौरवोद्‌गार

शिवभोजन थाळींत दोन पोळ्या, भात, वरण, भाजी दिल्या जाते. जेवणाचा दर्जाही चांगला असतो. त्यामुळे दहा रुपयांत मिळणारे जेवण उत्तम असल्यामुळे नागरिक समाधानी असल्याचे दिसून आले आहे. जेवताना दहा रूपयांत काय मिळते? अशा चर्चा होत असल्याचेही दिसून आले आहे. दहा रूपयांत नाष्टासुद्धा मिळत नाही. उद्धव ठाकरे यांनी तर फक्त दहा रूपयांत गरमागरम पोळी, वरण, भात, भाजी असा सकस आहार देण्याची सोय केली असून हा एक चांगला निर्णय असल्याचेही लोक बोलताना दिसून आले.

शिवसैनिकांचा ‘वॉच’

शिवभोजन कंेद्रांवर शिवसैनिक अचानक भेटी देऊन या योजनेबाबत माहिती घेताना दिसून येत आहेत. तसेच लोकांना योग्यप्रकारे जेवण दिल्या जात आहे की नाही याचीही खातरजमा शिवसेनेचे कार्यकर्ते करताना दिसून येत आहेत. असाच एक प्रकार नागपूर येथील तुकडोजी पुतळा, कॅन्सर हॉस्पिटल येथील शिवभोजन केंद्रावर घडला. तीन शिवसैनिक अचानक या केद्रावर आले. काही कळण्याच्या आत त्यांनी आतमध्ये प्रवेश करून लोक जेतानाचे फोटो काढले. तसेच सर्वकाही व्यवस्थित आहे का याची पाहणी केली. या प्रकारामुळे शिवभोजन केंद्र चालवणारी महिला संतापली. मात्र त्या तरूणांनी अत्यंत नम्रपणे सांगितलं की, ताई आम्ही शिवसेनेची माणसं आहोत आणि हा आमचा ड्रिम प्राेजेक्ट आहे. असे लोक जेवताना पाहून आम्हाला किती आनंद होत आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, असे बोलून ते तरूण निघून गेले. त्यामुळे या योजनेवर शिवसैनिकांचा वॉच असल्याचे दिसून आले आहे.

थाळींची संख्या वाढवण्याची गरज

नागपूर येथील कॅन्सर हॉस्पिटल समोर सुरू झालेल्या शिवभोजन केंद्राला भेट दिली असता येथील जेवणाचा दर्जा चांगला असल्याचे लक्षात आले. जवळपास दोन सरकारी रूग्णालये असल्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना या शिवभोजनाचा फायदा होतो. मात्र केवळ ७५ थाळींचीच मर्यादा या केंद्राला असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे या केंद्राला थाळींची संख्या वाढवून देण्याची मागणी होत आहे.

पत्रकार संदीप अंभोरे, मोबाईल -9702758195