शाहुवाडीतील दाम्पत्याचे संविधानाच्या साक्षीने मंगलपरिणय

शिवाजी कोण होता? ग्रंथाचे पाहुण्यांना वाटप

मुंबई । संदीप अंभोरे
लग्नसमारंभातील चालीरिती आणि रितीरिवाजाला फाटा देत प्रदीप यंशवंत कांबळे, रा. उखळू, तालुका. शाहुवाडी आणि जयश्री प्रकाश सोनावणे, रा. भादोले, ता. हातकणंगले यांचा विवाह सोहळा तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आभिवादन करून, भारतीय संविधान व शहिद कॉ. गोविंद पानसरे, लिखीत शिवाजी कोण होता? या दोन ग्रंथांच्या साक्षीने 22 डिसेंबर २०१९ रोजी संपन्न झाला.
आजकाल कोणत्याही लग्न समारंभात मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. यामध्ये
बहुतांश येणाऱ्या पाहूण्यांच्या पाहुणचारासाठी वेळ आणि पैसा वाया जात असतो. त्यामध्ये कोणी येणाऱ्यांना टॉवेल- टोपी, किंवा नारळ आदी वस्तू देतात. प्रत्येकजण आपल्या ऐपती प्रमाणे विवाहासाठी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करतो. विवाहादरम्यान असणाऱ्या दोन कुटूंबातील भेटीच्या कार्यक्रमा दरम्यान टॉवेल-टोपी व एकमेकांना साखर भरवण्यात येते, ही कित्येक वर्षे जुनी परंपरा या लग्नावेळी मोडीत काढण्यात आली आणि भेटीदरम्यान एकमेकांना शिवाजी कोण होता? हे पुस्तक देण्यात आले. त्याचबरोबर विवाहात उपस्थित असणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला, मित्र परिवाराला, भेट म्हणून हे पुस्तक देण्यात आले. टॉवेल-टोपी, नारळ याचा काडीमात्र कोणाला उपयोग होत नाही. या लग्नसोहळ्यावेळी पुस्तकांच्या वाटपामुळे वैचारिक विचारांची देवाणघेवाण झाली. तसेच समाजामध्ये एक वेगळा पायंडा पडला आणि जुनी परंपरा मोडीत निघाल्याची चर्चा होताना दिसत होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणारे कॉ. पानसरे लिखीत शिवाजी कोण होता? हे पुस्तक वाचनात आले तेव्हापासूनच लग्नात हे पुस्तक वाटण्या
चा निर्णय घेतला होता. त्यामुळे वैचारिक बांधिलकी जपल्याचे समाधान आहे. -प्रदिप कांबळे
माझ्या घरचे वातावरण पुरोगामी विचारांचे आहे. त्यामुळे घरामध्ये हे पुस्तक होते, मी वाचलेही होते, परंतु लग्नामध्ये शिवाजी कोण होता? हे पुस्तक वाटले जाईल हे माहित नव्हते. जुन्या परंपरा मोडीत काढून माझ्या सासरच्या मंडळींनी घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान आहे.
-जयश्री सोनावणे
लग्न समारंभात पुस्तके वाटुन येणाऱ्या पाहूण्यांचे स्वागत केल्याने किमान त्या व्यक्तीच्या घरात ते पुस्तक जाईल, त्यामुळे ते पुस्तक किमान एकदा तरी वाचले जाईल, असा आमचा हेतू होता. त्यामुळेच आम्ही सर्व वायफळ गोष्टींना बगल देत असा अनोखा विवाहसोहळा घडवून आणला.
-हरिश कांबळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष एआयएसएफ

पत्रकार संदीप अंभोरे

मोबाईल-9022271640, 9702758195